माझ्या लहानपणी बालभारतीमध्ये एक गोष्ट होती - दिनूचे बिल. त्या गोष्टीतला दिनू - एक किशोरवयीन मुलगा, कुठेतरी एक डॉक्टरांनी दिलेले बिल पाहतो आणि त्यातला मजकूर वाचून त्याची उत्सुकता वाढते. तो मजकूर असतो -
१. रोगाचे निदान चाचणी रु. १००
२. डॉक्टरांची फी रु. १००
३. औषधे रु. ५०
एकूण रु. २५० फक्त
त्या मजकुराचा अर्थ जसजसा त्याला अवगत होतो, त्याच्या मनात एक वेगळीच कल्पना रुजू लागते. घरी येऊन तो एक कागद घेतो आणि भराभर त्यावर लिहायला सुरुवात करतो.
१. वाण्याकडून सामान आणणे रु. १०
२. आईच्या पूजेसाठी फुले आणणे रु. ५
३. आईचा तातडीचा निरोप शेजारी जाऊन देणे. रु. ५
एकूण रु. २० फक्त
हा कागद दिनू आईला नेऊन देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनूला त्याच्या बिछान्याशेजारी एक लिफाफा ठेवलेला दिसतो. त्या लिफाफ्यावर मोठ्या अक्षरात "दिनूस..." असे लिहिलेले असते. दिनू लिफाफा उघडतो आणि त्याला आत एक कागद आणि करकरीत अशा दहा रुपयाच्या दोन नोटा दिसतात. २० रुपये पाहून खुश झालेला दिनू तो कागद बाहेर काढतो आणि वाचायला सुरुवात करतो.
१. दिनूला लहानपणापासून वाढवणे रु. ०
२. दिनूच्या आजारपणात त्याची देखभाल करणे रु. ०
३. दिनूसाठी रोज जेवण बनवणे रु. ०
एकूण रु. शून्य फक्त .
हा मजकूर वाचता वाचता दिनूला एकदम भरून येते. धावत धावत तो आईजवळ जातो आणि ढसाढसा रडतो. त्याला कुशीत घेऊन आई म्हणते - “आता मला माझी पूर्ण फी मिळाली ”.
तर अशी काहीशी हि दिनू आणि त्याच्या बिलाची गोष्ट... माझ्या लहानपणीची.
दिनूचा मुलगा आता त्याच्या गोष्टीतल्या मुलाएवढा झालाय. युट्युब आणि तत्सम विद्यालयांमधून मिळणाऱ्या भरमसाठ संस्कारांवर वृद्धी पावणारा दिनू ज्युनिअर आणि दिनू सिनिअर यांच्यात परवाच झालेला सुसंवाद.
दिनू ज्यु. : मी तो प्लेस्टेशनवरचा तो राक्षसांचा गेम घेऊ?
दिनू सि. : कुठला गेम?
दिनू ज्यु. : अरे तो राक्षसांचा... त्यात ते दोन राक्षस हॅ हॅ करत येतात आणि तो दोघांनी खेळायचा असतो. आणि मग एक राक्षस जिंकतो.
दिनू सि. : (मोबाईल वर नक्की कुठला गेम ते पाहत) बघूया तरी कितीला आहे ते. तुला माहिती आहे ना हा गेम विकत घ्यायला लागतो ते? नो वे... वीsssस डॉलर्स...
आहेत का रे तुझ्याकडे वीस डॉलर्स?
दिनू ज्यु. : माझ्याकडे आहेत ना वीस डॉलर्स. टूथ फेरीने दिलेले मी ठेवलेत ना..... (आत जाऊन त्याच्या पिगी बँकमधून वीसची एक नोट घेऊन येतो.)
दिनू सि. : तुला एवढा हवाय हा गेम कि तू तुझ्या टूथ फेरीचे पैसे देऊन हा विकत घेणारेस? आणि तुला नंतर लागले हे वीस डॉलर्स तर?
दिनू ज्यु. : ( विचारात....)
दिनू सि. : अजून किती दात आहेत तुझ्या बोळक्यात?
दिनू ज्यु. : येस्स ! टूथ फेरी देईल कि अजून.
दिनू सि. : तू तुझे कायमचे दात देणार टूथ फेरीला? आणि तिने नाही घेतले तर?
दिनू ज्यु. : ( परत विचारात....)
दिनू सि. : (दिनू ज्यु. च्या दुर्गामातेकडे न बघितल्यासारखे करून ) मग नक्की घ्यायचाय तुला हा गेम?
दिनू ज्यु. : हो. हे घे वीस डॉलर्स.
दिनू सि. : (सराईतपणे वीसची नोट घेऊन आणि मोबाईलवरून गेम खरेदी करून ) हा घे... घेतला तुझा गेम. गो अँड प्ले व प्लेस्टेशन. आणि आता हे वीस डॉलर्स माझे.
दिनू ज्यु.ची आई : (दिनू ज्यु.ला) अरे हे टूथ फेरीने तुला इम्पॉर्टन्ट गोष्टींसाठी दिलेत पैसे. (हो म्हणून दिनू ज्यु. बाहेर पसार)
दिनू ज्यु.ची आई : अरे काहीतरी शरम कर. तुझा सख्खा पोटचा पोरगा आहे तो.
दिनू सि. : (पाकिटात वीसची नोट नीट ठेवत) तरी मी त्याला टॅक्स नाही लावला. म्हणजे खरं तर डिस्काउंट दिलाय मी त्याला.
दिनू ज्यु.ची आई : (अगतिक आणि निरुत्तर)
या आजच्या दिनूच्या गोष्टीतून ज्याने त्याने आपापले तात्पर्य शोधावे !


